10 उपयुक्त औषधी वनस्पति
उत्तम आरोग्यासाठी १० उपयुक्त औषधी वनस्पति
भारतात प्राचीन काळापासून औषधी गुणधर्म असलेल्या वनस्पतींचा उपयोग आरोग्याच्या तक्रारींसाठी करण्यात आलेला आहे. अशाच काही महत्वाच्या वनस्पतींची माहिती आज करून घेऊया.
१ ) तुळस -
आपल्याकडे तुळस ही पवित्र मानली जाते. तुळस घरातली हवा शुद्ध राखते. त्यामुळे घरात एक तरी तुळशीचे रोप असावे. सर्दी, ताप आणि अपचनाच्या तक्रारींवर तुळस हा एक रामबाण उपाय आहे. अॅसिडिटीचा त्रास होत असल्यास तुळशीची ४-५ पाने चावून खावीत त्याने लगेच आराम पडतो. पोट दुखत असेल तर तुळशीचा रस थोडा लिंबाचा रस घालून घ्यावा म्हणजे दुखणे थांबते. तुळशीचे बी शरीरातील उष्णता कमी करते.
२) गवती चहा -
गवतीचहाला संस्कृत मध्ये सुगंध तृण असे म्हणतात. गवतीचहाच्या काढयामुळे सर्दी खोकला कमी होतो व घाम येऊन ताप उतरायला मदत होते. हा काढा मूत्रल म्हणजे लघवी साफ करणारा आहे. अपस्मार, पोटातील वात तसेच त्वचा विकारांवर गवतीचहाचे तेल अतिशय उपयुक्त आहे.
३) कढीपत्ता -
कढीपत्ता पाचक असल्यामुळे अन्न चांगले पचते. यात ‘अ‘ जीवनसत्व असते. जुलाब, उलटी,अजीर्ण या विकारात कढीपत्त्याचा उपयोग होतो. कृमि झाले असल्यास कढीपत्त्याची पाने वाटून त्यात सम प्रमाणात मध व गूळ मिसळून दिल्यास कृमि नाहीसे होतात. कढीपत्त्याची पाने नियमित खाल्ल्याने रक्तशुद्धी होते. कढीपत्त्याच्या पानांचे चूर्ण तेलात मिसळून केसांच्या मुळाना लावल्यास केस गळायचे थांबतात.
४) कोथिंबीर -
कोथिंबीरीत पुष्कळ औषधी गुणधर्म आहेत. कोथिंबीरीची पाने यकृत निरोगी ठेवण्यासाठी मदत करतात. हायपोथायरॉयडीझम, मधुमेह, उन्हाळे लागणे यासाठी कोथिंबीर उपयुक्त ठरते. कोथिंबीरीत ‘अ’ जीवनसत्व असल्यामुळे डोळ्यांचे आरोग्य चांगले राहते. कोथिंबीरीमुळे वाईट कॉलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी होते आणि धन्याचे पाणी ट्राईग्लिसराईडसची पातळी नियंत्रित ठेवते.
५) पुदिना -
पुदिन्यामधे इतके औषधी गुण आहेत की प्रत्येक घरात तुळशी प्रमाणे पुदिना देखील असावा. पुदिना हा पाचक असल्यामुळे अपचन, जुलाब या विकारांवर अतिशय लाभदायी ठरतो. पुदिन्याचे पाणी शरीरातील विषारी द्रव्ये बाहेर फेकण्यास मदत करते. पुदिन्याचा रस कृमि नाहीशा करतो, त्वचेवरचे काळे डाग घालवतो आणि केस गळणेही थांबवतो.
६) मेथी -
मेथीची पाने व मेथीदाणे शरीरासाठी हितकर आहेत. यातील लोहामुळे शरीरातील हिमोग्लोबीन वाढण्यास मदत होते व कॅल्शियममुळे हाडे मजबूत होतात. मेथीच्या भाजीमुळे स्तनपान करणाऱ्या माताना जास्त दूध येते. मेथी मधुमेहासाठी खूप प्रभावी आहे. मेथीमध्ये अँटीऑक्सिडंट गुणधर्म असल्याने कॅन्सरला प्रतिबंध होतो. मेथीमुळे रक्तातील कोलेस्टेरॉल कमी होते व वजन कमी करण्यास मदत होते. मेथी केसांच्या तक्रारीवर अतिशय उपयुक्त आहे.
७) कडूनिंब -
गुढीपाडव्याला कडूनिंबाची पाने खाल्ली जातात. या काळात होणारे उष्णतेचे विकार टाळण्यासाठी व शरीराची रोगप्रतिकारक शक्ति वाढवण्यासाठी कडूनिंब उपयोगी ठरतो. कडूनिंब मधुमेह नियंत्रित करतो व कॅन्सरचा धोका टाळतो. कडूनिंबाची वाळलेली पाने धान्यात ठेवल्याने त्यात कीड होत नाही. त्वचेचे विकार बरे करण्यासाठी गरम पाण्यात कडूनिंबाची पाने उकळवून ते पाणी आंघोळीकरता वापरावे.
८) आवळा -
आवळा हा क जीवनसत्वाचा (विटामीन सी) सर्वोत्तम स्त्रोत आहे. आवळ्यामुळे रोगप्रतिकारक शक्ति वाढते. केस काळे राहतात व कोंडा होत नाही. आवळ्यातील अँटीऑक्सिडंटस् मुळे रक्तशर्करा नियंत्रणात राहते. आवळा अपचन, बद्धकोष्ठ यासारख्या विकारात आरामदायी ठरतो. ताजा आवळा फक्त थंडीच्या मोसमात मिळत असल्याने, मोरावळा किंवा आवळ्याचे चूर्ण हा इतर मोसमात उत्तम पर्याय आहे.
९) कोरफड -
कोरफड सूर्याच्या अतिनील किरणांपासून आपले रक्षण करते तसेच केसांच्या समस्या व त्वचा रोगावर गुणकारी आहे. त्वचेवरील सुरकुत्या व प्रसूतिनंतरचे स्ट्रेच मार्क्स कोरफड कमी करते. कोरफडीचा गर किरकोळ भाजल्याच्या व कापल्याच्या जखमा लवकर बऱ्या करतो. आतडी आतून स्वच्छ ठेवतो. अनियमित पाळी, पॉलिसीस्टिक ओव्हरी यासारख्या स्त्रियांच्या समस्यांवर कोरफड उपयोगी पडते. मात्र गरोदरपणी कोरफड वर्ज्य आहे.
१०) ओवा -
ओवा हे पोटदुखीवरचे रामबाण औषध आहे. पोटदुखी व कृमि याकरता ओवा किंवा ओव्याच्या पानांचा रस उपयुक्त ठरतो. ओव्यामुळे सर्दी, पडसे, कफ, डोकेदुखी व सायनसच्या त्रासापासून आराम मिळतो. लघवी प्रमाणाबाहेर जास्त होत असल्यास ओवा व गूळ सम प्रमाणात एकत्र करून त्याच्या गोळ्या कराव्या व एका वेळी याची अर्धा ग्रॅमची एक गोळी घ्यावी. याने लघवीचे प्रमाण कमी होते.
सध्या आपली जीवनशैली बदलत चालली आहे त्यामुळे आपण निसर्गापासून दूर जात आहोत. निसर्गातील या औषधी वनस्पति आपण घरात लावू शकतो शिवाय धने, मेथीदाणे, ओवा हे स्वयंपाकघरात कायम असतात त्यामुळे सहजपणे उपलब्ध होऊ शकतात. चला तर मग निसर्गाकडे वळूया आणि आरोग्याच्या छोट्या तकारींसाठी या वनस्पति वापरूया.
(टीप : या लेखात उल्लेख केलेले उपचार करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)
Comments
Post a Comment